Slide 1 of 1 

"उद्धव ठाकरे व भास्कर जाधवांचा बदला घेतल्याशिवाय गप्प राहणार नाही.."
शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे आमदार वैभव नाईक यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्यात येत आहे. या चौकशीविरोधात कुडाळ येथे निषेध रॅलीचे आयोजन उद्धव ठाकरे समर्थकांकडून करण्यात आले होते. या रॅलीमध्ये आमदार भास्कर जाधव यांनी राणे कुटुंबावर जहरी टीका केली होती.
जाधवांच्या टीकेला भाजपकडून 'संविधान बचाव रॅली'च्या माध्यमातून उत्तर देण्यात आलं. या रॅलीमध्ये भाजप नेते आणि विधानपरिषद आमदार प्रसाद लाड यांनी भाजप कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे. "उद्धव ठाकरे व भास्कर जाधवांचा बदला घेतल्याशिवाय गप्प राहणार नाही.." असं विधान देखील लाड यांनी यावेळी केलं आहे.
काय म्हणाले आमदार प्रसाद लाड ?
"संविधान बचाव रॅलीच्या माध्यमातून आम्ही ज्यांनी आणीबाणी रॅली काढली त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहोत. कसली आणीबाणी रॅली काढता. तुम्ही चिंधीचोर आहात. तुमच्यावर चोरीचे गुन्हे आहेत. आपण त्यांचे नावही घ्यायला नको. आपण वैभव नाईक यांचे नाव चिंधीचोर ठेवुया. तर भास्कर जाधव यांचं नाव 'आयटम गर्ल' ठेवुया. मी भास्कर जाधव यांचं भाषण ऐकलं, ते खूप नाटक करतात. चित्रा वाघ यांनी त्यांच्यावर योग्य टीका केली आहे. या लोकांची नावे घेऊन आपण त्यांना मोठं करायचं नाही. चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालावा म्हणून एक आयटम साँग असते. अगदी तशाच प्रकारे उद्धव ठाकरे यांचे भास्कर जाधव हे आयटम गर्ल आहेत. ते विधानसभेत एक बोलतात, बाहेर एक बोलतात. एवढीच ताकद होती, तर तुम्हाला उद्धव ठाकरे यांनी मंत्री का केले नाही. भास्कर जाधव उदय सामंत यांच्या पाया पडत होते. आज ते आम्हाला शिकवत आहेत. उद्धव ठाकरे आणि भास्कर जाधव यांचा बदला घेतल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही.."
Tags:
1
399 Views