Slide 1 of 1
पवार कुटुंबातील चुलत भावांचा पिंपरी- चिंचवडमध्ये संघर्ष?
अशोक बालगुडे
पुणे, दि. 21 : राष्ट्रवादीमधील फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार असा चुलते- पुतणे संघर्ष सुरु असताना आता पवार कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील रोहित आणि पार्थ पवार या दोन चुलत बंधूंमध्ये राजकीय संघर्ष सुरु होण्याची शक्यता आहे. पार्थनंतर आता आमदार रोहित यांनीही पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात लक्ष घातले आहे. त्यामुळे दोन बंधूंच्या संघर्षाचा नवा अध्याय पिंपरी-चिंचवडकरांना पहायला मिळण्याची शक्यता आहे.
बारामती खालोखाल पिंपरी-चिंचवड हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. या बालेकिल्ल्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांची दादागिरी चालते. त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र पार्थ यांचेही शहरात लक्ष असते. परंतु, आता हा बालेकिल्ला पुन्हा एकदा शरद पवारांना काबीज करायचा आहे. त्यासाठी त्यांनी नातू आमदार रोहित पवारांकडे पिंपरी-चिंचवडची धुरा सोपविली. त्यामुळे भविष्यात शहराच्या राजकारणात काका अजित विरुद्ध पुतणे रोहित आणि रोहित विरुद्ध पार्थ पवार या बंधूमध्ये राजकीय संघर्ष पहायला मिळू शकतो.
शहराच्या पहिल्याच दौऱ्यात रोहित यांनी आक्रमक भूमिका घेतली. अप्रत्यक्षपणे अजित पवारांना थारेवर धरले. तरुण तुषार कामठे यांच्याकडे शहराध्यक्षपदाची धुरा सोपविली. संघटना म्हणून मोठी ताकद लावली जाईल. शरद पवार यांच्या विचारांचे नगरसेवक निवडून आणले जातील. कोणाच्या सांगण्यावरुन नव्हे तर सर्वेक्षण करुन उमेदवारी दिली जाईल, असे सांगितले. रोहित यांची भाषण शैली, लोकांमध्ये मिसळणे ही कार्यपद्धती युवांना भावताना दिसते. याउलट पार्थ दरबारी राजकारण करताना दिसतात. नियमितपणे शहराकडे न फिरकणे, जनतेत न मिसळणे, केवळ प्रशासकीय अधिका-यांना पार्थ भेटताना दिसले. लोकसभेला पाच लाख मते मिळूनही ते चिंचवड विधानसभेच्या पोट निवडणुकीपासून दूर राहिले. वडिलांचा बालेकिल्ला शाबूत ठेवण्यासाठी पार्थ तर आजोबांना पुन्हा शहरातील सत्ता मिळवून देण्यासाठी रोहित प्रयत्नशील आहेत. त्यामुळे या दोन चुलत बंधूमधील संघर्ष पिंपरी-चिंचवडकरांना पहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
breaking
breaking
Tags:
60 Views
Like
Comment
Share