Slide 1 of 1
Sharad Pawar व्हीएसआयच्या बैठकीला दादांनी शरद पवारांसमोर जाणं टाळलं!
दुसऱ्यांदा बैठकीला अनुपस्थितीमुळे राजकीय चर्चेला उधाण
अशोक बालगुडे
पुणे, दि. 15 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत मांजरी बु।। येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीला दांडी मारून ते खासगी कामानिमित्त दौंडकडे निघून गेले आहेत. त्यामुळे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष शरद पवार यांचे स्वागत राज्य सरकारमधील मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं. सर्वोच्च न्यायालयात पक्ष आणि चिन्हाचा वाद सुरू असताना अजितदादांनी शरद पवार यांच्यासमोर येणं टाळलं का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या संचालक मंडळाच्या बैठकीसाठी शरद पवार आणि अजित पवार आज एकत्र येतील, अशी शक्यता होती. परंतु या बैठकीला अजित पवार यांनी अनुपस्थिती लावली. पुण्यात असूनही त्यांनी बैठकीला दांडी मारली आणि खासगी कामासाठी दौंडला गेले. गेल्या वेळीही संचालक मंडळाच्या बैठकीला अनुपस्थिती लावून अजित पवार यांनी शरद पवार यांची गुप्त भेट घेतली होती. उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या पुण्यातील निवासस्थानी ही गुप्त भेट झालेली होती. आज अजित पवार बैठकीला दांडी मारून दौंडकडे गेल्याने दादांच्या मनात नेमकं काय आहे? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटची बैठक शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. आज सकाळी १० वाजता या बैठकीला सुरुवात झाली होती. या बैठकीला शरद पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील तसेच अन्य संचालक मंडळ उपस्थित होते. कार्यकारी मंडळाचे सदस्य या नात्याने अजित पवार यांच्या उपस्थितीची सगळ्यांनाच प्रतिक्षा होती. मात्र दादांनी ऐनवेळी ही बैठक कॅन्सल करून दौंडकडे खासगी कामानिमित्त कूच केले. एकंदरित शरद पवार यांच्यासमोर जाण्याचं अजित पवार यांनी सलग दुसऱ्यांदा टाळलं आहे.
Tags:
51 Views
Like
Comment
Share