Slide 1 of 1
महाराष्ट्राचे राजकारण तापणार ः सीएमच्या प्रेसला राऊत जाणार?
मुंबई, दि. 15 ः छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या (शनिवार, दि. 16 सप्टेंबर, 2023) मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेत शिवसेना ठाकर गटाचे खासदार संजय राऊत एक पत्रकार म्हणून उपस्थित राहणार आहे. संजय राऊत यांनीच तसे जाहीर केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद चांगलीच वादळी ठरण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांना परवानगी मिळणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मराठवाड्यात दरवर्षी होणारी मंत्रिमंडळ बैठक सात वर्षांच्या खंडानंतर होत आहे. या बैठकीनंतर मराठवाड्यासाठी काही ठोस घोषणा होईल, अशी अपेक्षा आहे. आपर्यंतच्या घोषणांचे काय झाले? असाही प्रश्न या निमित्त उपस्थित होत आहे. मात्र, यंदा केवळ घोषणा करुन नाही तर ठोस पावले उचलावी लागतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण सत्ताधाऱ्यांविरोधातील रोष वाढत आहे. यात आता संजय राऊत यांनी केलेल्या या घोषणेमुळे मुख्यमंत्री कात्रीत पकडले जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, खासदार संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेत संधी दिल्यास उपस्थित राहणार आहे. तसेच, मुख्यमंत्री यांना प्रश्न देखील विचारण्याची इच्छा राऊत यांनी व्यक्त केली आहे.
खासदार राऊत म्हणाले... "उद्या कॅबिनेटची बैठक आहे, त्यामुळे आम्ही येथेच थांबणार आहोत. बैठक तीन तासांची आहे. त्यानंतर मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलणार आहेत. त्यानंतर आम्ही त्यांच्याशी बोलू, तुम्ही किती खोटे बोलत आहेत हे आम्हाला ऐकायचे आहे. आम्हाला संधी मिळाली तर त्या पत्रकार परिषदेत आम्ही हजर राहू, समोरासमोर प्रश्न विचारु. आम्ही देखील पत्रकार आहोत. त्यामुळे मी जाणार आहे. आम्हाला जर पोलिसांनी अडवले नाही तर, त्या पत्रकार परिषदेत मी सुद्धा जाईन. तुमच्या हातात कायद्याच्या बंदुकी आहे, त्यामुळे तुम्ही अडवले नाही तर मी नक्की जाणार आहे. तसेच मुख्यमंत्री यांना पत्रकार म्हणून प्रश्न विचारणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
Tags:
Like
Comment
Share