Slide 1 of 1
सांडपाण्याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर
स्थानिक नागरिक प्रचंड त्रासले ः ससाणेनगर लेन क्र.12 गंधर्व गीत येथील प्रकार
अशोक बालगुडे
पुणे, दि. 14 ः ससाणेनगर लेन क्र.12च्या पाठीमागील गंधर्व गीत परिसरात सांडपाण्याची वाहिनी ठिकठिकाणी नादुरुस्त झाली असून, दुर्गंधीयुक्त पाण्याची डबकी साचली आहेत. त्यामुळे डास-मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील कीटकनाशक विभागाकडे वारंवार तक्रार करूनही अधिकारी-कर्मचारी गांभीर्याने घेत नसल्याने रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशारा स्थानिक रहिवाशांनी दिला आहे.
राजेंद्र ससाणे, रामचंद्र जगताप, नितीन धिवाडकर, शशांक कवडे, सचिन कोकाटे, सचिन भोसले, गणेश मोरे म्हणाले की, मागिल तीन महिन्यापासून डास-मच्छरांचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. याप्रकरणी हडपसर क्षेत्रीय कार्यालयात निवेदन दिले असून, वारंवार स्मरणही केले. या विभागातील निंबाळकर खरात यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. मात्र, त्यांच्याकडून उपाययोजनेऐवजी काम टाळण्याची भूमिका घेतली जात आहे. ससाणेनगर लेन क्र.12 येथील पाठीमागे असलेल्या गंधर्व गीतचा पार्किंग व बेसमेंट आहे. येथील सांडपाण्याची वाहिनी नादुरुस्त झाल्याने पाणी गळती होत आहे. त्यामुळे सांडपाणी पार्किंगमध्ये जमा होत आहे. पावसाळी वाहिनीमध्ये तांत्रिक त्रुटी असल्याने पाण्याचा निचरा होत नाही. पार्किंग खड्ड्यात असल्याने पाणी वाहून जात नसल्याने पाण्याचे डबके साचले असून, दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे कीटकांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती झाल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
दरम्यान, हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील सहायक आयुक्त बाळासाहेब ढवळे-पाटील म्हणाले की, ससाणेनगर लेन क्र.12 गंधर्व गीत परिसरातील सांडपाण्याच्या वाहिनीची पाहणी करून तातडीने दुरुस्ती करून कीटकनाशक फवारणी केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
Tags:
Like
Comment
Share