पैशाच्या हव्यासापोटी दुचाकी चोरणारा वायरमन जेरबंद
पाच दुचाकी जप्त ः भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी
पुणे, दि. ९ : झटपट श्रीमंतीचे डोहाळे लागलेल्या दुचाकी चोरट्या वायरमनला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. कुणाल सुरेश बधे (वय २९, रा. रांजणे, ता. वेल्हा, जि. पुणे) असे अटक केलेल्या दुचाकी चोरट्याचे नाव आहे. आरोपीकडून पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी सांगितले की, कात्रज भागातील आंबेगाव परिसरात गस्तीवर असलेल्या पोलिसांना लिपाणे वस्ती भागात दुचाकी चोरटा थांबल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेऊन तपास केला. त्यावेळी आरोपीने दुचाकी चोरल्याची कबुली दिली. बधे वायरमन आहे. झटपट पैसे कमाविण्यासाठी त्याने दुचाकी चोरीचे गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, गुन्हे शाखेचे निरीक्षक विजय पुराणिक, सहायक निरीक्षक गिरीश दिघावकर, अमोल रसाळ, धीरज गुप्ता, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, हर्षल शिंदे, सचिन सरपाले आदींनी ही कामगिरी केली.
Tags:
Like
Comment
Share