Slide 1 of 1 

दापोडीतील गायकवाड कुटुंबीयांना पालिकेने आर्थिक मदत व मनपात नोकरी देण्याची होतेय मागणी-
दापोडी येथील स्नेहलता गायकवाड यांच्या मृतदेह अदला बदलीच्या प्रकारामुळे गायकवाड कुटुंबियांना त्यांचे अंतिम दर्शन घेवून अंत्यसंस्कारही करता आले नाहीत. आधी अपघाती निधन व त्यानंतर मृतदेहाची अदलाबदल या प्रकारामुळे गायकवाड कुटूंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला.सतत हसमुख व मनमिळाऊ स्वभाव अशी स्नेहलता गायकवाड यांची दापोडीत ओळख होती. या प्रकारामुळे दापोडीकरांवर शोककळा पसरली आहे.महापालिकेने दोषींवर कायदेशीर कारवाई करावी याचबरोबर गायकवाड कुटुंबियांना आर्थिक मदत व महापालिकेच्या सेवेत नोकरी देण्याची मागणी दापोडीकरांकडून होत आहे. याबाबत निवेदनाद्वारे येथील भाजपा सचिव विशाल वाळूंजकर यांनी मनपा आयुक्त यांच्याकडे मागणी केली आहे.निवेदनात म्हटले आहे की,दापोडी येथील आत्तारविट येथील स्नेहलता अशोक गायकवाड यांच्याबाबत घडलेल्या घटनेमुळे दापोडीतील गायकवाड कुटुंबीयांना मानसिक त्रास व धक्का बसला असून, त्यांचे न भरून येणारे नुकसान झालेले आहे. मृतदेह अंत्यसंस्कारासाठी न मिळणे ही सदैव मानसिक त्रास देणारी घटना आहे. झालेल्या घटनेची चौकशी करून दोषी डॉक्टर ,अधिकारी , कर्मचारी यांच्यावर कारवाई करून निलंबित करण्यात यावे व गायकवाड यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत व कुटुंबातील एका सदस्याला मनपा शासकीय सेवेत नोकरी देण्यात यावी.